पुणे दि,१५:- नगर जिल्हातील शिवाजीराव नारायण नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा मुलगा, पृथ्वीराज व त्याच्या दोन सहकाऱ्यांना, पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीपाट नाक्यावर दहा ते पंधऱा जणांच्या जमावाने जबर मारहाण केली.
लोणी काळभोर : ह़ॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणावरुन नगर जिल्हातील शिवाजीराव नारायण नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा मुलगा, पृथ्वीराज व त्याच्या दोन सहकाऱ्यांना, पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट नाक्यावर दहा ते पंधऱा जणांच्या जमावाने जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. 14) रात्री आठच्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी पृथ्वीराज राजेंद्र नागवडे (वय 25, रा. वांगदरी ता. श्रीगोंदा, नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी मांजरी बुद्रुक (ता. हवेली) हद्दीतील मांजरी फार्म परीसरातील निलेश दिवेकर, सागर मुळे, विनोद ढोरे, शुभम हरपळे, महेश डोमाले, विराज हरपळे यांच्यासह दहा अनोळखी तरुणांच्या विरोधात जिवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, निलेश दिवेकर याच्यासह पंधऱा जणांच्या विरोधात शनिवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज नागवडे व त्यांचे दोन मित्र योगेश भोईटे व मनिष जाधव हे तीन जण शनिवारी रात्री आठ वाजनेच्या सुमारास हडपसरहुन लोणी काळभोरमार्गे श्रीगोंदा येथे जाण्यासाठी दोन चारचाकी वाहनातुन निघाले होते. पृथ्वीराज नागवडे यांची चारचाकी पुणे-सोलापुर महामार्गावरील मांजरी ग्रीन चौकात आली असता, त्याच्या चारचाकीला निलेश दिवेकर चालवत असलेली यूनिकॉर्न मोटरसायकल आडवी आली. मोटारसायकल आडवी आल्याने, पृथ्वीराज यांनी त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडीचा हॉर्न वाजविला. हॉर्नचा आवाज येताच, निलेश दिवेकर याने मोटारसायकल थांबवून, नागवडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या योगेश भोईटे व मनिष जाधव या दोन मित्रांनी, नागवडे यांना समजाऊऩ गाडीत बसण्याची विनंती केली. यावर नागवडे हे चारचाकी बसत असतानाच, निलेश दिवेकर याने नागवडे यांना आमच्या एरीयात आम्हाला नडतोस का, असे म्हणत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दिवेकर व नागवडे यांच्यातील वाद पाहून, स्थानिक नागरीक जमा होऊ लागल्याने, नागवडे आपल्या वाहनात बसून लोणी काळभोर बाजुकडे वेगात निघून जाऊ लागले.
त्याचवेळी दिवेकर याने आपल्या कांही मित्रांच्या साह्याने नागवडे याच्या वाहनाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. नागवडे यांचे वाहन कवडीपाट टोलनाक्यावर पोचताच, मागून सात ते आठ दुचाकीवरुन आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या जमावाने नागवडे यांची चारचाकी फोडली. तसेच हातीतील लोखंडी रॉड, पट्टे व लाकडी दांड्यांच्या साह्याने नागवडे यांना बेदम मारहाण केली. तर नागवडे यांना जमावाच्या तावडीतून सोडविण्यासाठी आलेल्या योगेश भोईटे व मनिष जाधव या दोघांनाही दिवेकर व त्याच्या वरील मित्रांनी धक्काबुक्की केली.दरम्यान, ही बाब लोणी काळभोर पोलिसांना समजताच, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. पोलिसांनी नागवडे व त्याच्या दोन मित्रांना जमावाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दिवेकर व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांनीही आरेरावी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी नागवडे व त्याच्या सहकाऱ्यांना घटनास्थळावरुन हलविले. त्यानंतर रात्री उशीरा नागवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी निलेश दिवेकर व त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.