पुणे,दि.०१:- पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगार व्यंकटेश उर्फ विकी शिवशंकर अनपुर याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तब्बल 71 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार व्यंकटेश उर्फ विकी शिवशंकर अनपुर (वय-31 रा. सहयोगनगर, वारजे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. विकी अनपुर याला एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे.
विकी अनपुर हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असुन त्याने त्याच्या साथीदारांसह पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिस्टल, कोयता, तलवार, चाकू, लाकडी दांडका यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगा, जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी
विकी अनपुर याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके,पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी केली.