पुणे,दि.१७:-“पुण्यात घडलेल्या पोर्शे प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी ज्या गतीने व कार्यक्षमतेने तपास केला, अल्पावधीत आरोपींना ताब्यात घेतले, ते कायदा सर्वांसाठी समान असतो, याचे उत्तम उदाहरण आहे”, असे प्रतिपादन पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
कुणाची आर्थिक सत्ता, सामाजिक स्थान यांचे दडपण न घेता, कायद्यापुढे सर्वांना समान लेखण्याची ही कृती पोलिस यंत्रणा कार्यक्षम असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करणारी ठरली, आणि टीकाकारांना उत्तर देणारी ठरली, असेही अमितेश कुमार म्हणाले.
पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स, सिमेक्स, एसिस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सुरक्षित पुणे पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे बोलत होते. सुरक्षित पुणे उपक्रमाचे ब्रॅंड अंबेसिडर एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले तसेच पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे या मान्यवरांचीही उपस्थिती यावेळी होती.
यावेळी बोलताना अमितेश कुमार म्हणाले, “कोणतीही यंत्रणा म्हणजे जादूची छडी नसते. पुणे शहरातील ८० लाखांहून अधिक लोकवस्तीचे झाले आहे. अशा ठिकाणी दिवसाचे २४ तास दक्ष राहून पोलिस यंत्रणा आपले कर्तव्य बजावत असते. शहराच्या कुठल्याही कोपऱ्यात काही घडले – बिघडले की पोलिस यंत्रणा तत्काळ कार्यान्वित होते आणि त्वरित घटनास्थळी पोचण्याच्या प्रयत्नात असते. पोलिसांना आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावता यावे, यासाठी आधुनिक साधने, सामग्री व तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. मात्र, शहरातील प्रत्येक नागरिकांचेही एक कर्तव्य आहे, ते म्हणजे दक्ष आणि सतर्क राहणे. आपल्या आसपास कोणतीही संशयास्पद हालचाल, कृती, व्यक्ती आढळल्यास त्वरित यंत्रणेला कळवणे, हे जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे.”
मी आपल्याला सांगतो, योग्य ठिकाणी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, हस्तक्षेप करावा, माहिती द्यावी, पोलिस यंत्रणा तुम्हाला प्रतिसाद देईल, यावर विश्वास ठेवा. एकमेकांच्या सहकार्याने, परस्पर विश्वासानेच आपण आपले शहर, भवताल आणि वातावरण सुरक्षित ठेवू शकू, असेही त्यांनी नमूद केले.
अग्निशमन दलाचे प्रमुख पोटफोडे यांनी पडद्यामागील सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गौरव करत असल्याची कृतज्ञता व्यक्त केली. “आपल्या शहरातील रस्ते, प्रचंड लोकसंख्या, दाटीवाटीची वस्ती, झोपडपट्ट्या, पुरेशी दक्षता न घेता उभारले जाणारे उद्योग यामुळे सुरक्षेला धोका उत्पन्न होत आहे. अग्निशमन दलाकडे मनुष्यबळ, साधनसामग्रीची कमतरता असूनही दलाकडून सातत्याने प्रत्येक ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आपल्या कामाच्या जागा, उद्योगाच्या जागा व यंत्रणा पुरेशा सुरक्षित असल्याची काळजी संबंधित समाज घटकांची असल्याचे स्मरण प्रत्येकाला असावे, असेही ते म्हणाले.
गोखले यांनी ‘बाह्य व अंतर्गत सुरक्षा या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असतात, याची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे, असे सांगितले.
‘घटनेने सुरक्षेचा अधिकार दिला आहे. नव्या काळात सर्व प्रकारच्या सुरक्षेला अन्य घटकांकडून आव्हाने दिली जात आहेत. त्यासाठी प्रत्येकाने सजग असणे गरजेचे आहे. आपल्या युवा पिढीने नवकल्पनांच्या साह्याने या आव्हानांचा सामना केला पाहिजे’, असेही गोखले यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पोलिस, वाहतूक पोलिस, अग्निशमन दलातील कार्यक्षम कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव अमितेश कुमार, देवेंद्र पोटफोडे व भूषण गोखले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच हाॅटेल, शिक्षणसंस्था, काॅर्पोरेट, माॅल, बॅंक, वर्क स्पेस अशा विविध आस्थापनांत सर्वोत्कृष्ट सुरक्षेचे मानदंड प्रस्थापित करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना गौरवण्यात आले. कश्यता भाटिया यांनी सूत्रसंचालन केले. पूर्वेश गडा यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.
यावेळी द रिट्झ – कार्लटन (सुरक्षित हॉटेल), डीबीएस बँक (सुरक्षित बँक), जीजी इंटरनॅशनल स्कूल, बाश चासिस सिस्टीम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, महिंद्रा रायल को आप हऊसिंग सोसायटी, ॲमनोरा मॉल, टाटा कम्यूनिकेशन्स, वुई वर्क इंडिया मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, इंटिग्रेटेड सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर – एचएसबीसी बंक, बिझनेस कंटिन्यूटी अंड इन्सिडंट मॅनेजमेंट – एचएसबीसी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल वर्कस्पेस सोल्यूशन्स, ग्लोबल कार्पोरेट सिक्यूरिटी प्रोजेक्ट टीम ऑफ बँक ऑफ न्यूयार्क, मॉडर्न सिक्युरिटी फोर्स यांना सन्मानित करण्यात आले.याबरोबरच अंबरीश पुरोहित, राजेंद्र सोनावणे, किरण चिंचोरे, ज्योती मीना,
टायगर्स ऑफ पुणे सन्मानाने जस्मिन शेख, मयूर पानसरे, किरण पोतदार, गणेश कांबळे, सोनू पांडे, भानूदास अकोलकर, रजत कबदल, गजानंद ठोके, नील गायकवाड यांना गौरविण्यात आले.
आयुष (अलर्ट सिटीझन), कर्नल संदीप सुदान यांना जीवनगौरव सन्मान देण्यात आला.