पुणे,दि.१३:- लोणी काळभोर हद्दीतील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील मटका जुगाराच्या अड्ड्यावर दरोडा विरोधी बपथकाने बुधवारी (ता.१२) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी सुमारे १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तर याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन बाबुराव काळभोर (वय ४८, रा. लोणी काळभोर, बसवराज हिराप्पा रामपुरे (वय ६४, रा. कदमवाकवस्ती, संतोष राजु चंद्रमनी,रा कदमवाकवस्ती ता. हवेली), बाळासाहेब सदाशिव घाडगे (वय ५१,रा कोरेगांव. नानासाहेब शंकर रंदिल (वय ५८, रा कदमवाकवस्ती ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार दत्तात्रय खरपुडे (दरोडा विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर) व पोलीस हवालदार ज्ञानेश्वर गिरमकर यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत दरोडा विरोधी पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती (त. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पुना हॉटेलच्या जवळ एका रिक्षामध्ये मटका घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, सचिन काळभोर व बसवराज रामपुरे हे दोघे बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळ घेताना दिसले. पोलिसांनी या छाप्यात १० हजार ५०० रुपये रोख रक्कम व एक रिक्षा असा सुमारे १ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दुसऱ्या घटनेत, पोलिसांनी कदमवाकवस्ती (त. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ छापा टाकला होता. तेव्हा संतोष चंद्रमनी, बाळासाहेब घाडगे व नानासाहेब रंदिल हे तिघे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळ घेताना आढळून आले. या छाप्यात पोलिसांनी तिघांकडून १० हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ५ जणांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश कुंभार करीत आहेत.