पिंपरी,दि.१४ :- महागाई आणि बेरोजगारीने जनता होरपळली असताना केंद्र सरकार मात्र ‘कुंभकर्णी’ झोपेचे सोंग घेत आहे. सात वर्षापुर्वी फसवी आश्वासने देऊन केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भांडवलदारांना रेड कार्पेट टाकून गोरगरीब जनतेला उध्वस्त करणारी धोरणे अवलंबिली आहेत. सामान्य जनतेच्या मुळावर उठलेल्या या केंद्रातील भाजप सरकारला देशभरातील जनता आता सवाल करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. पुढील पंधरवड्यात पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने शहरभर ‘हाहाकार’ जनजागरण अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन केंद्र सरकारविरुध्द निषेध नोंदवावा असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने 14 ते 29 नोव्हेंबर पर्यंत राज्यभर जनजागरण अभियान सुरु करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने रविवारी (दि. 14 नोव्हेंबर) नेहरुनगर येथिल पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभियानास सुरुवात करण्यात आली. त्याअंतर्गत थेरगाव परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा समारोप थेरगाव येथिल अनुसया मंगल कार्यालयात सभा घेऊन करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव आणि पिंपरी चिंचवड प्रभारी विजय बारसे, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे, प्रदेश सचिव गौतम आरकडे, माजी महापौर कविचंद भाट, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, सेवा दल शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, आयोजक इरफान शेख, याकूब इनामदार, महिला नेत्या छायाताई देसले, प्रतिभा कांबळे, मल्याळी समाज नेते के. एम. रॉय तसेच बाबा बनसोडे, विजय ओव्हाळ, हिराचंद जाधव, उमेश बनसोडे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, आबा खराडे, सतिश भोसले, किरण नढे, राजाराम भोंडवे, इस्माईल संगम, अजिंक्य बारणे, शुशिला धनवत, बसवराज शेट्टी, दादा देडे, नयन पालांडे, रवी नांगरे, विश्वनाथ जगताप आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी बहुभाषिक, बहुधार्मिक, अखंडप्राय भारत देशाला एकसंध बांधण्याचे काम केले. देशातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानुन धोरणे आखली. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच देशात उद्योग कारखाने उभे राहिले. हेच सार्वजनिक उद्योग भांडवलदारांच्या घशात घालून गोरगरीब जनतेला गुलामगिरीत ढकलण्याचे षडयंत्र मोदी, शहा यांचे सरकार करीत आहे अशीही टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे म्हणाले की, दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करु असे सांगणा-या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दरवर्षी कोट्यावधी युवक बेरोजगार होत आहेत. हिटलरशाही पध्दतीने एका रात्रीत घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत.
त्यामुळे लाखो कुटूंबे देशोधडीला लागली आहे. गरीबांसाठी कॉंग्रेस सरकारने सुरु केलेले रेशनिंगचे धान्य डाळी, रॉकेल, तेल आणि गॅसचे अनुदान या सरकारने बंद केले आहे. ज्या राज्यात विधानसभा निवडणूका आहेत त्या राज्यांपुरते अनुकूल निर्णय घ्यायचे आणि इतर राज्यांमध्ये कृत्रिम महागाई निर्माण करुन जनतेला वेठीस धरायचे असे कुटील राजकारण भाजप सरकार करीत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील जनता आता रस्त्यावर उतरत आहे. पिंपरी चिंचवड मधिल नागरिकांनीही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असेही आवाहन पृथ्वीराज साठे म्हणाले.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि महात्मा जोतीराव फुले यांचे आद्यक्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त नेहरु आणि साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.स्वागत आयोजक इरफान शेख सुत्रसंचालन युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे आणि आभार याकूब इनामदार यांनी मानले.