मुंबई : वृत्तसंस्था – वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या अभिनेत्रीने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत आणि रसिक मनावर छाप स्मिता पाटील त्यांच्या निधनानंतर त्यांचे जवळपास चौदा चित्रपट प्रदर्शित झाले होते.
कौटुंबिक पार्श्वभूमी –
राजकीय नेते शिवाजीराव पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई यांची कन्या असलेल्या स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुण्यात झाला. पुण्यातील रेणुका स्वरूप स्मृती हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्या मॅट्रिकला असतानाच त्यांचे वडील शिवाजीराव पाटील मंत्री झाले, पण स्मिता पाटील त्यांच्यासोबत मुंबईला न जाता पुण्यातच आपल्या एका मैत्रिणीकडे राहिल्या. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यातील फर्गुसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
करिअर –
महाविद्यालयात असतानाच त्यांचा थिएटर अॅकॅडमीच्या ग्रूपशी परिचय झाला. अभिनयातील त्यांचे पदार्पण झाले ते ‘तीव्र मध्यम’ या अरुण खोपकर दिग्दर्शित एफ.टी.आय.आय.च्या पदविका फिल्ममधून. त्यानंतर दोन वर्षांनी पुण्याहून मुंबईला आल्यावर दूरदर्शनच्या माध्यमातून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या दूरदर्शन वाहिनीवर स्मिता पाटील वृत्तनिवेदिक म्हणून काम करू लागल्या.
स्मिता पाटील यांची भेट निर्माते-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याशी झाली. स्मिता यांची प्रतिभा ओळखून त्यांनी ‘चरण दास चोर’ चित्रपटात त्यांना संधी दिली. पहिल्याच चित्रपटाने स्मिता पाटील यांना स्टार बनवले. त्यानंतर मात्र स्मिता पाटील यांनी मागे वळून पाहिलं नाही.
१९८५ मध्ये स्मिता पाटील यांची भूमिका असलेला केतन मेहता दिग्दर्शित ‘मिर्च मसाला’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. स्मिता पाटील यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास एका दशकापेक्षाही कमी कालावधीचा होता. मात्र त्यांनी ८० पेक्षा जास्त हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या. जैत रे जैत, उंबरठा, निशांत, चक्र, मंथन, भूमिका, गमन, आक्रोश, अर्थ, बाजार, मंडी, मिर्च मसाला, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, अर्धसत्य, शक्ति, नमक हलाल, अनोखा रिश्ता यासारखे अनेक चित्रपट गाजले.
इतर भाषेतील चित्रपट –
स्मिता यांनी ‘अनुग्रहम’ हा तेलगू, ‘भवानी भवाई’ हा गुजराती, ‘अकालेर,’ ‘देवशिशू’ आणि ‘अश्वमेधेर घोडा’ हे बंगाली चित्रपट केले. ‘अन्वेषणे,’ ‘कोडुरा’ या चित्रपटात आणि ‘चिदंबरम’ या मल्याळम चित्रपटातही त्यांनी काम केले होते. अमिताभ बच्चनसोबत ‘नमक हलाल’ आणि ‘शक्ति’ सारखे चित्रपट त्यांनी केले.
विसाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये आलेल्या स्मिता यांनी ७५ चित्रपटांमध्ये काम केले.
स्मिता पाटील आणि वादविवाद –
स्मिता पाटील यांचं वैयक्तिक आयुष्यही अनेक वादांमुळे गाजलं. अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत वाढत्या जवळीकीमुळे मीडियामध्ये त्यांची चर्चा झाली. नादिरासोबत लग्न झालेलं असतानाही स्मिता पाटील सोबत सुरु असलेलं राज यांचं अफेअर चर्चेचा विषय ठरलं.
स्मिता पाटील-राज बब्बर यांच्या नात्याला स्मिता यांच्या आईचा विरोध होता. महिलांच्या हक्कासाठी लढणारी स्मिता दुसऱ्या स्त्रीचा संसार कसा मोडू शकते, हा प्रश्न त्यांना सतावत असे.
पुरस्कार –
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्र्रीय स्तरावरही स्मिता पाटील यांच्या कामाचा गौरव करण्यात आला. कोस्टा गॅव्हरास या आंतरराष्ट्रीय पातळीवरील श्रेष्ठ दिग्दर्शकाने स्मिता पाटील यांच्या चित्रपटांचा महोत्सव भरवला होता. अशा प्रकारचा मान मिळवणार्या त्या पहिल्याच भारतीय अभिनेत्री ठरल्या. मॉंट्रियल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्यांनी परीक्षकाची भूमिका निभावली होती. १९८५ मध्ये नैरोबी येथे झालेल्या जागतिक महिला परिषदेमध्ये स्मिता पाटील यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २६ जानेवारी १९८५ रोजी केंद्र सरकारने स्मिता पाटील यांचा ‘पद्मश्री’ किताबाद्वारे सन्मान केला.